बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील, सोमेश्वर हॉटेलमध्ये भीषण आग लागली.. या भीषण आगीत सोमेश्वर हॉटेलमधील काही एकामागोमाग दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. दुकानावरील पत्रे उडून गेली तर शेजारच्या दुकानांचेही मोठे नुकसान झाले आहे.. ही घटना रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
प्राथमिक माहितीनुसार, गावातील डिडवाणी यांच्या पाईपच्या दुकानात प्रथम आग लागली. ही आग काही वेळातच शेजारील अरसुडे यांच्या सोमेश्वर हॉटेलमध्ये पसरली. आगीत हॉटेलमधील गॅस सिलेंडर पेट घेऊन सलग दोन स्फोट झाले. या स्फोटांच्या धक्क्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली.
आगीच्या ज्वाला उंचच्या उंच जात असल्याने दूरवरून धुराचे लोट दिसत होते. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. आगीत नेमके किती नुकसान झाले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र आजूबाजूच्या अनेक दुकानांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. रात्रीची वेळ असल्याने सर्व दुकाने बंद झाली होती, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई आणि परळी येथील अग्निशमन दल तातडीने दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. अद्यापही आग धुमसत असल्याची माहिती आहे. नेमकी आग कशामुळे लागली हे तपासाअंती स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या भीषण घटनेमुळे घाटनांदूरमध्ये काही काळ भीतीचे व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा