DLM ADVT

0


छत्रपती संभाजीनगर, दि.२५- संस्कारक्षम व गुणवत्ताधारक विद्यार्थी घडविण्यासाठी जिल्ह्यात सुरु असलेल्या दशसूत्री उपक्रमांतर्गत आज जिल्ह्यात एकाच वेळी १९२० शाळांमध्ये पालक सभांचे आयोजन करण्यात आले. आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत. चांगले नागरिक घडविण्यासाठी त्यांचा सर्वांगिण विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षणासोबत त्यांच्यावर संस्कार रुजविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.

            गाडीवाट केंद्र कचनेर ता. छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजीत पालक सभेस आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी स्वतः उपस्थित होते. दशसूत्री उपक्रमांतर्गत आज जिल्ह्यात सर्वत्र पालक सभांचे आयोजन करण्यात आले.

            जिल्हाभरात १९२० शाळांमध्ये हा कार्यक्रम आज पार पडला. जिल्ह्यात दशसूत्री हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना संस्कारक्षम, आरोग्यक्षम, कौशल्य क्षम, स्पर्धा क्षम विद्यार्थी घडविण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होणे अपेक्षित असून त्याद्वारे शैक्षणिक गुणवत्तेसोबतच अन्य संस्कार जसे संतसाहित्य वाचन, पौष्टिक आहाराबाबत जागृती, क्रीडा कौशल्य, ज्येष्ठांचा आदर यासारख्या अनेक बाबी शिकविल्या जात आहेत.  या उपक्रमात पालकांचा सहभाग आवश्यक असून त्यासाठी या उपक्रमाबाबत पालकांना आजच्या पालकसभांद्वारे अवगत करुन त्यांचा सहभाग देण्याबाबत आवाहन करण्यात आले.

            गाडीवाट येथील प्राथमिक शाळेतील पालक सभेत जिल्हाधिकारी स्वामी यांच्या समवेत सरपंच ज्ञानेश्वर भालके, तहसिलदार शिवानंद बिडवे, गट शिक्षण अधिकारी चेतन कांबळे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीराम केदार,मंडळ अधिकारी आश्विनी सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आसिफ शेख, कोळगे गुरुजी , मुख्याध्यापक प्रभाकर गायकवाड आदी उपस्थित होते,

            जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या वाढीसाठी  आपण सगळेच प्रयत्न करीत असतो. मात्र विद्यार्थ्यांना अन्य कौशल्येही शिकवायला हवी. संत साहित्यात जीवनाविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन आहे. ते संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवायला हवे. आयुष्यात येणारे लहानमोठे अपयशाचा ते सामना करु शकले पाहिजे.

या कार्यक्रमाला गावातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विस्तार अधिकारी श्रीराम केदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top