दिल्ली : लाल किल्ला मेट्रो स्टेशनबाहेर वाहनात भीषण स्फोट — आठ जणांचा मृत्यू
राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या बाहेर एका पार्क केलेल्या वाहनात सोमवारी सायंकाळी मोठा स्फोट झाला. या स्फोटात किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत . जखमींना तातडीने एलएनजेपी (Lok Nayak Jai Prakash) रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत .
घटना सायंकाळी साधारण ६.३० ते ७ या वेळेत घडली. मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ बाहेर उभ्या असलेल्या वाहनात जोरदार स्फोट झाला. स्फोटानंतर आग भडकली आणि जवळ उभ्या असलेल्या काही वाहनांना देखील आग लागली . स्फोटाचा आवाज मोठा असल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. पादचारी आणि प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ केली.
स्फोटानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट पसरले होते आणि बचाव पथकांनी मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्याचे काम केले. पोलिसांनी परिसर सील केला असून गर्दी असलेला हा भाग तत्काळ रिकामा करण्यात आला. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तपास सुरू केला आहे. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही; तपास सुरू आहे .
घटनेनंतर संपूर्ण दिल्लीमध्ये उच्च सतर्कता (High Alert) जाहीर करण्यात आली आहे . पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून स्फोटातील वाहनाचे अवशेष जप्त करून फॉरेन्सिक तज्ज्ञांकडे पाठवण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.
लाल किल्ला परिसर हे नेहमीच गर्दीचे व पर्यटन क्षेत्र असल्याने सुरक्षा यंत्रणांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. या घटनेमुळे मेट्रो प्रवास आणि आसपासचा वाहतूक मार्ग काही काळासाठी विस्कळीत झाला होता.

टिप्पणी पोस्ट करा