ई, दि. ३ : राज्यातील अंगणवाड्यांना आधुनिक, सशक्त आणि पारदर्शक बनवून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी स्मार्ट अंगणवाडी योजनेअंतर्गत राज्यभरात व्यापक कार्यवाही सुरू आहे. या योजनेअंतर्गत उत्कृष्ट सरपंच म्हणून गौरविण्यात आलेल्या १३ सरपंचांच्या गावांमध्ये स्मार्ट अंगणवाड्या उभारण्यात आल्या असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, १३ गावांतील अंगणवाड्यांना स्मार्ट स्वरूप देण्यात आले आहे. या केंद्रांमध्ये अत्याधुनिक सुविधा, डिजीटल शिक्षण साधने, तसेच बालक आणि मातांसाठी आरोग्य व पोषण जनजागृती उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. हे काम पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद आहे. एकात्मिक बालविकास सेवा (आयसीडीएस) योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये बालकांना आरोग्य, पोषण आणि पूर्व-प्राथमिक शिक्षण या तिन्ही क्षेत्रांत मूलभूत सेवा पुरविल्या जातात. या अंगणवाड्यांना स्मार्ट बनविण्याच्या उपक्रमामुळे त्यांच्या पायाभूत सोयी-सुविधांमध्ये सुधारणा झाली असून, शिक्षण आणि पोषण सेवा अधिक प्रभावी पद्धतीने दिल्या जात आहेत.
महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हणाल्या की, स्मार्ट अंगणवाडी हे केवळ इमारतीचे नव्हे, तर बालक आणि मातांच्या उज्ज्वल भविष्याचे प्रतीक आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि संवेदनशील दृष्टिकोन यांचा संगम घडवून अंगणवाड्यांना आदर्श केंद्र बनवण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून, राज्यातील सर्व अंगणवाड्यांना टप्प्याटप्प्याने स्मार्ट स्वरूप देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा