चार दिवस-चार रात्रींचा प्रवास; पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोलीमार्गे मोर्चा १९ सप्टेंबरला मुंबईत; आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषणाची घोषणा
जालना, दि. १२ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १५ वा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर आयोजित राज्यव्यापी निर्णायक बैठकीत जरांगे पाटील यांनी मुंबई आंदोलनाची तारीख आणि मोर्चाचा मार्ग जाहीर केला. १५ सप्टेंबर २०२६ रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने कूच करण्यात येणार असून, चार दिवस आणि चार रात्रींच्या प्रवासानंतर पाचव्या दिवशी मोर्चा मुंबईत पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजबांधवांना संबोधित करताना जरांगे पाटील भावनिक झाले. त्याचवेळी आरक्षणाच्या लढ्यासाठी निर्णायक संघर्ष करण्याची हाक त्यांनी दिली. “मराठ्यांनो तुमच्या अंगातलं रक्त आता उसळू द्या, आरक्षणासाठी लई फाईट होणार,” असे सांगत मुंबईत मोठे आंदोलन उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
🚩 १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटीतून कूच
जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या नियोजनानुसार १५ सप्टेंबर २०२६ रोजी आंदोलक अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना होतील. हा प्रवास सलग चार दिवस आणि चार रात्री चालणार आहे. पाचव्या दिवशी म्हणजेच १९ सप्टेंबर २०२६ रोजी मोर्चा मुंबईत दाखल होईल.
मुंबईतील आझाद मैदानावर १९ सप्टेंबरपासून जरांगे पाटील बेमुदत आमरण उपोषण सुरू करणार असल्याचेही बैठकीत जाहीर करण्यात आले.
🛣️ असा असेल मुंबई आंदोलनाचा मार्ग
अंतरवाली सराटीतून निघाल्यानंतर मोर्चाचा पहिला मुक्काम पाटोदा येथे असेल. त्यानंतर दुसरी रात्र श्रीगोंदा, तिसरी रात्र हडपसर आणि चौथी रात्र खोपोली येथे मुक्काम केला जाणार आहे. पाचव्या दिवशी आंदोलक मुंबईत पोहोचतील आणि आझाद मैदानाकडे जातील.
🚨 “रक्त सांडले तर शांततेच्या मार्गाने महाराष्ट्र बंद”
बैठकीत बोलताना जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाले. आरक्षणासाठीचा संघर्ष मोठा असल्याचे सांगत आंदोलनादरम्यान कोणत्याही मराठा तरुणाच्या जीवाला धोका निर्माण झाला किंवा रक्त सांडले, तर संपूर्ण महाराष्ट्रात शांततेच्या मार्गाने अवघ्या १० मिनिटांत बंद पाळला गेला पाहिजे, असे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले.
⚠️ कर्ज काढून मुंबईला येऊ नका
मुंबई आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी शांतता आणि शिस्त पाळण्याचे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले. आर्थिक अडचण असलेल्या समाजबांधवांनी कर्ज काढून मुंबईला येऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
गावोगावी मराठा समाजाने ठिय्या आंदोलन करावे आणि मुंबईतील आंदोलनासाठी आर्थिक वर्गणी गोळा करावी, असेही त्यांनी सांगितले.
🔥 “आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घेणार नाही”
मुंबई आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना जरांगे पाटील यांनी “फक्त माझं हे आंदोलन पूर्ण होऊ द्या, मुंबईला जाऊन आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घेणार नाही,” असा निर्धार व्यक्त केला.
आरक्षण मिळाल्यानंतर मराठवाड्यात जायकवाडी धरणाचे पाणी फिरवणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
⚖️ “नियम पाळू; पण आंदोलन मुंबईतच”
मोर्चा गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेबाबत राजकीय वर्तुळातून शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आंदोलनाच्या ठिकाणाबाबत जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली.
“न्यायालयाचे किंवा प्रशासनाचे जे नियम असतील ते आम्ही पाळू, परंतु आंदोलन मुंबईतच होणार,” असे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा