गांधी जयंती, घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात प्रतिबंधात्मक आदेश; जमावबंदी, शस्त्रे व प्रक्षोभक कृत्यांवर निर्बंध
छत्रपती संभाजीनगर : आगामी सण-उत्सव, २ ऑक्टोबर रोजीची महात्मा गांधी जयंती, ११ ऑक्टोबर रोजीचा घटस्थापना दिवस तसेच विविध राजकीय पक्ष व संघटनांकडून मोर्चे, धरणे आणि आंदोलने होण्याची शक्यता लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये हे आदेश जारी केले आहेत.
हा आदेश १ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजेपासून १५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई
आदेशानुसार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमणे, मोर्चे काढणे, निदर्शने करणे, धरणे देणे तसेच मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र अंत्यविधी, विवाह समारंभ, कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि पूर्वपरवानगी घेऊन आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
शस्त्रे, दाहक पदार्थ आणि प्रक्षोभक कृत्यांवर निर्बंध
शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या तसेच शारीरिक इजा होऊ शकेल अशा वस्तू जवळ बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. लोखंडी किंवा स्टीलचे पाईप तसेच दुधाच्या सायलन्सरचा वापर करून गाडी पद्धतीने फोडण्यासाठी बंदूक तयार करणे आणि सार्वजनिक ठिकाणी तिचा वापर करण्यासही मनाई करण्यात आली आहे. आदेशात अशा प्रकारामुळे मानव आणि पशुपक्ष्यांना गंभीर इजा होण्याची शक्यता नमूद करण्यात आली आहे.
कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ सोबत बाळगणे, दगड किंवा अन्य क्षेपणास्त्रे फेकण्यासाठी किंवा सोडण्यासाठी साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
प्रक्षोभक भाषणे, घोषणा आणि प्रतिमांच्या प्रदर्शनालाही मनाई
कोणत्याही व्यक्तीची प्रतिमा किंवा प्रेत अथवा आकृतीचे प्रदर्शन करणे, जाहीर घोषणा देणे, गाणी म्हणणे किंवा वाद्ये वाजविणे यामुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असल्यास अशा कृत्यांवर प्रतिबंध राहणार आहे.
सक्षम अधिकाऱ्यांच्या मते ज्यामुळे सभ्यता किंवा नैतिकतेला बाधा पोहोचू शकते, राज्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येऊ शकते किंवा अशी चित्रे, चिन्हे, फलक अथवा अन्य वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन किंवा जनतेमध्ये प्रसारण करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई
प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच शाखा प्रभारी अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा