अंतरवाली सराटीतील राज्यव्यापी निर्णायक बैठकीत मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत गंभीर आरोप करत १५ सप्टेंबरपासून मुंबईकडे निघण्याची घोषणा
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १५ वा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर आयोजित राज्यव्यापी निर्णायक बैठकीत जरांगे पाटील यांनी राज्य सरकारसह महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्यावर गंभीर आरोप केले. त्याचबरोबर आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करत १५ सप्टेंबर २०२६ पासून अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने कूच करण्याची घोषणा त्यांनी केली.
⚡ “बावनकुळेंनी जिल्हाधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणला”
जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याबाबत बोलताना जरांगे पाटील यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट आरोप केला. जिल्हाधिकारी महिला असल्याचा गैरफायदा घेत बावनकुळे यांनी त्यांच्यावर राजकीय दबाव आणला, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.
मराठा आरक्षणाचे आंदोलन उधळून लावण्याचे कारस्थान सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला. हे बावनकुळे आणि छगन भुजबळ यांच्या सांगण्यावरून केले जात असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी बैठकीत केला.
🚨 जिल्हाधिकाऱ्यांना थेट सुनावले
प्रशासकीय कामकाजामध्ये स्त्री-पुरुष असा भेद असू शकत नाही, अशी भूमिका मांडत जरांगे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांवरही टीका केली. जनतेच्या प्रश्नांवरून होणारी टीका सहन होत नसेल तर सन्मानाने पदावरून खाली उतरावे, असे ते म्हणाले.
“कलेक्टर म्हणून सर्वांना समान न्याय द्या. विनाकारण गोरगरीब मराठा समाजाच्या अन्नात विष कालवण्याचे काम करू नका, अन्यथा याचे परिणाम होतील,” असा इशाराही त्यांनी दिला.
🎙️ जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदांवर आक्षेप
जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार पत्रकार परिषदा घेऊन राज्य सरकारची बाजू मांडू नये, अशी भूमिकाही मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मांडली. मराठा आरक्षणाच्या मागण्या राज्यस्तरावरील असून सरकार आणि आंदोलनकर्ते हा विषय आपापसात पाहून घेतील; प्रशासनाने त्यामध्ये पडू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
⚠️ ED नोटिसांवरून सरकारवर गंभीर आरोप
आपल्या आजूबाजूच्या आणि निकटवर्तीय व्यक्तींना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) नोटिसा पाठवून धमकावले जात असल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केला.
अंतरवाली सराटीतील सामान्य लोकांची ईडी चौकशी लावण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर टीका केली. “ज्यांच्या घरात धड फरशी बसवण्याची ऐपत नाही, त्यांची ईडी चौकशी लावून सरकारने ईडीची किंमत काय ठेवली आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
🚩 १५ सप्टेंबरपासून मुंबईकडे कूच
मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत सरकारकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने आता मुंबईला जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. त्यानुसार १५ सप्टेंबर २०२६ रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघण्याची घोषणा त्यांनी केली.
हा मोर्चा पाटण, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोली मार्गे पुढे जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. १९ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचून तेथे बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा