Top News

🚨💻 छत्रपती संभाजीनगरात ‘CEO Fraud’चा धक्कादायक प्रकार! 😱 मालकाच्या मुलीचा WhatsApp DP अन् अकाउंटंटला ‘तातडीचे’ मेसेज! 📲⚠️ अवघ्या दीड तासात ₹3.70 कोटी गायब!! 💸🔥


छत्रपती संभाजीनगर : कंपनीच्या संचालकांच्या मुलीचा फोटो WhatsApp DP म्हणून वापरून आणि मालकाच्या संवादशैलीची नक्कल करून एका इन्फ्रा कंपनीच्या अकाउंटंटची तब्बल ३ कोटी ७० लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. गारखेडा परिसरातील एसडी दवंडे इन्फ्रा प्रा. लि. या कंपनीत हा प्रकार घडला. अकाउंटंट दिगंबर सोपानराव माने यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर गुन्हेगारांनी या फसवणुकीसाठी कंपनीच्या संचालकांचे WhatsApp हॅक किंवा मिरर करून अकाउंटंट आणि मालक यांच्यातील जुन्या चॅटिंगचा अभ्यास केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर संवादाची पद्धत आणि भाषेची शैली हुबेहूब वापरत एका मोबाइल क्रमांकाच्या DPवर संचालकांच्या मुलीचा फोटो ठेवण्यात आला. त्यामुळे संदेश पाठवणारी व्यक्ती कंपनीचे मालकच असल्याचा अकाउंटंटला विश्वास बसल्याचे तक्रारीतील माहितीतून समोर आले आहे.

१४ आणि १५ सप्टेंबरदरम्यान हा प्रकार घडला. मालकाच्या नावाने इंग्रजीतून तातडीचे संदेश पाठवून सुरुवातीला कंपनीच्या बँक खात्यांमधील शिल्लक रक्कम आणि त्याचे स्क्रीनशॉट मागवण्यात आले. त्यानंतर परराज्यातील वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये RTGSद्वारे पैसे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

सुरुवातीला १ कोटी ७० लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले. त्यानंतर दुपारी एका हॉस्पिटलच्या नावावर असलेल्या बँक खात्यात आणखी २ कोटी रुपये पाठवण्यास सांगण्यात आले. अशा प्रकारे एकूण ३ कोटी ७० लाख रुपये संबंधित खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले.

पैसे पाठवण्यापूर्वी माने यांनी खात्री करण्यासाठी मूळ मालकांना फोन केला होता. मात्र त्यावेळी फोन उचलला गेला नाही. दुसरीकडे WhatsAppवरून तातडीने व्यवहार करण्यासाठी संदेश येत असल्याने त्यांनी त्यानुसार पैसे पाठवले.

दुपारी मूळ संचालकांनी अकाउंटंटला फोन केल्यानंतर या व्यवहारांचा उलगडा झाला. आपण संबंधित WhatsApp संदेश पाठवलेलेच नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कोट्यवधी रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तातडीने सायबर पोलिसांकडे धाव घेण्यात आली.

या प्रकरणात पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि गुन्हे शाखेच्या पथकाने केंद्रीय सायबर क्राईम विंग I4C तसेच बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. फसवणुकीची रक्कम पुढे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचे समोर आले.

पोलिसांनी या खात्यांशी संबंधित धागा पकडत तातडीने कारवाई केली. त्यानंतर संबंधित खात्यांमधील एकूण सुमारे ४ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम फ्रीज करण्यात यश आल्याची माहिती आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये कंपनीतील मॅनेजर किंवा अकाउंटंटला थेट लक्ष्य करून वरिष्ठ अधिकारी किंवा मालकाच्या नावाने पैसे ट्रान्सफर करण्यास सांगण्याच्या ‘CEO Fraud’ पद्धतीतील हा मोठा प्रकार असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वीही शहरातील अन्य द्योजक आणि डॉक्टरांना अशाच पद्धतीने लाखो ते कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची माहिती देण्यात आली आहे.

या प्रकरणात WhatsApp DP, पूर्वीच्या संवादाची शैली आणि तातडीच्या आर्थिक व्यवहारांच्या सूचनांचा वापर करून अकाउंटंटचा विश्वास संपादन करण्यात आल्याचा आरोप आहे. जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कोट्यवधी रुपयांच्या सायबर फसवणुकीचा पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने