Top News

कन्नडमध्ये रक्ताचा थरार: संशयाच्या भुताने घेतला बळी! झोपेतच पत्नीच्या डोक्यावर लाकडी दांडक्याचे घाव; माजी महापौरांच्या बहिणीची क्रूर हत्या!

 


कन्नड (छत्रपती संभाजीनगर) : नवरात्रोत्सवानिमित्त देवीचे दर्शन घेऊन आणि गरबा खेळून घरी परतलेल्या ४२ वर्षीय महिलेचा झोपेत असतानाच लाकडी दांडक्याने हल्ला करून खून करण्यात आल्याची घटना कन्नड शहरातील गजानन कॉलनीत घडली. रोहिणी मुकेश कुंभकर्ण असे मृत महिलेचे नाव असून, चारित्र्याच्या संशयातून पतीनेच हा हल्ला केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, घटनेनंतर संशयित पती मुकेश कुंभकर्ण याने स्वतः कन्नड शहर पोलीस ठाण्यात जाऊन पत्नीचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहिणी कुंभकर्ण या छत्रपती संभाजीनगरच्या माजी महापौरांच्या चुलत बहीण असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे कन्नड शहरात खळबळ उडाली आहे.

पहाटे पाचच्या सुमारास झोपेत असताना हल्ला

रोहिणी कुंभकर्ण या रविवारी रात्री नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर गेल्या होत्या. देवीचे दर्शन आणि गरबा खेळून त्या रात्री उशिरा घरी परतल्या. त्यानंतर त्या झोपेत असताना सोमवारी पहाटे सुमारे पाच वाजता त्यांच्यावर हल्ला झाल्याचे सांगण्यात येते. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, पती मुकेश कुंभकर्ण याने घरातील लाकडी दांडक्याने रोहिणी यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पती-पत्नीमध्ये सुरू असलेले कौटुंबिक वाद आणि चारित्र्याचा संशय हे या घटनेमागील संभाव्य कारण असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

पत्नीच्या हत्येनंतर थेट पोलीस ठाणे गाठले

संशयित पतीने घटनेनंतर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिल्याचे सांगण्यात येते. सकाळी सुमारे सहा वाजता मुकेश कुंभकर्ण दुचाकीवरून कन्नड शहर पोलीस ठाण्यात पोहोचला. तेथे उपस्थित ठाणे अंमलदारांसमोर त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनेची दखल घेतली.

पोलीस उपअधीक्षक आरती पवार घटनास्थळी

संशयिताने दिलेल्या माहितीनंतर कन्नड येथील प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक आरती पवार यांनी पोलीस पथकासह गजानन कॉलनीतील संबंधित घर गाठले. घरात रोहिणी कुंभकर्ण या मृतावस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

भावाच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा

रोहिणी कुंभकर्ण यांचे भाऊ रवींद्र घडामोडे यांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे कन्नड शहर पोलीस ठाण्यात मुकेश कुंभकर्ण याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या झाल्याचा प्राथमिक आरोप असला, तरी गुन्ह्याचा नेमका हेतू आणि आरोपीवरील आरोपांची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत निश्चित होणार आहे. कन्नड शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने