Top News

बळीराजाच्या डोळ्यात दुष्काळाचं पाणी, पण मंत्र्यांच्या दिमतीला 'बुलेटप्रूफ' लँड क्रूझरची गाणी! शेतकऱ्यांच्या अनुदानाला दमडी नाही आणि पाहुण्यांच्या चैनीसाठी कोट्यवधींचा चुराडा!


 

सुधीर भास्कर जगदाळे : विशेष संपादकीय 

ज्या मातीतून सोन्यासारखं पीक उगवावं, तिथं आज कोरड्या जमिनीला पडलेल्या भेगा बळीराजाचं काळीज चिरत आहेत. आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी सुकलेल्या पिकाकडे बघून रक्ताचे अश्रू गाळतोय. घरात पोराबाळांच्या भुकेचा टाहो आहे, विहिरींनी तळ गाठलाय आणि गोठ्यातली जनावरं चाऱ्यावाचून हंबरत आहेत. महाराष्ट्राच्या मातीवर पसरलेलं हे दुष्काळाचं भीषण मरण डोळ्यात पाणी आणणारं आहे. पण, जनतेच्या घामाच्या पैशावर चालणाऱ्या मुंबईतील वातानुकूलित मंत्रालयाला मात्र या मरणाची ना खंत आहे ना विवंचना! म्हणूनच की काय, जेव्हा इकडे शेतकऱ्याच्या आत्महत्येची टांगती तलवार मनावर असते, तेव्हा तिकडे मायबाप सरकार अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांच्या पाठीला साधी कळ लागू नये म्हणून चक्क १२ कोटींच्या आलिशान गाड्यांचा ताफा मंजूर करतं! त्यातही कहर म्हणजे, दुष्काळाच्या या होरपळीत मंत्र्यांच्या दिमतीला तब्बल ४ कोटी रुपयांची 'बुलेटप्रूफ' टोयोटा लँड क्रूझर गाडी खरेदी केली जातेय! हा केवळ प्रशासकीय निर्णय नाही, तर भर उन्हात जळणाऱ्या बळीराजाच्या सरणावर रचलेला हा क्रूर सत्तेचा सोहळा आहे!

महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळ, पाणीटंचाई आणि पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या एका निर्णयावरून नवा वाद निर्माण झाला आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि शासकीय पाहुण्यांच्या वाहतूक व्यवस्थेसाठी तब्बल १२ कोटी खर्चून ४४ नवीन वाहने खरेदी करण्यास राज्य शासनाने प्रशासकीय मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि व्हीआयपींच्या सुविधांवरील खर्च याबाबत सरकारच्या प्राधान्यक्रमावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

राज्यातील अनेक भागांत अपुऱ्या पावसामुळे पिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शासकीय वाहनांच्या खरेदीसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्याच्या निर्णयावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.

बळीराजाच्या जीवावर आलिशान गाड्या?

या खरेदीमध्ये टोयोटा इनोव्हा क्रिस्टा, टोयोटा फॉर्च्युनर, मारुती सुझुकी एर्टिगा, बुलेटप्रूफ टोयोटा लँड क्रूझर ३००, फोर्स अर्बनिया १६-सीटर बस आणि टाटा योद्धा टोइंग वाहन यांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या वाहनखरेदीच्या निर्णयावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते सचिन सावंत यांनी टीका केल्याचे वृत्त आहे. सावंत यांनी सरकारच्या खर्चाच्या प्राधान्यक्रमावर प्रश्न उपस्थित करताना सामान्य नागरिकांना काटकसरीचा सल्ला दिला जात असताना शासकीय सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.

सत्तेच्या डोळ्यात अंजन घालणारे आणि काळजाला चिरणारे काही जळजळीत प्रश्न:

  • ज्या बळीराजाच्या जीवावर तुमची सत्तेची सिंहासनं उभी आहेत, तो आज कोरड्या विहिरीत फाशीचा दोर शोधतोय; अशा वेळी त्याच्या हक्काच्या अनुदानासाठी तुमच्या तिजोरीत 'दमडी' का उरत नाही?
  • शेतकऱ्याच्या मोडलेल्या संसाराला सांधण्यासाठी 'निधी नाही' असं रडणारं सरकार, व्हीआयपी पाहुण्यांच्या चैनीसाठी एका रात्रीत ४ कोटींची बुलेटप्रूफ गाडी खरेदी करायला कुठून पैसे आणतं?
  • पाहुण्यांच्या आणि मंत्र्यांच्या जिवाला धोका आहे म्हणून तुम्ही बुलेटप्रूफ गाड्या घेता; पण कर्जाच्या विळख्यात अडकून दररोज मरणारा हा देशाचा पोशिंदा तुमच्या राज्यामध्ये 'अनप्रोटेक्टेड' (असुरक्षित) का आहे? त्याच्या जिवाची किंमत तुमच्या लेखी शून्य का आहे?
  • सांगा मायबाप सरकार, एसी गाड्यांच्या काचांमधून तुम्हाला त्या सुकलेल्या शेतात राबणाऱ्या बापाचे फाटलेले कपडे आणि त्याच्या भुकेल्या लेकरांचे डोळे कधीतरी दिसतील का? की तुमची संवेदनशीलताही या बुलेटप्रूफ गाड्यांसारखीच काच लावून 'प्रूफ' झाली आहे?

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने