छत्रपती संभाजीनगर : गणपती बाप्पाच्या आगमनासाठी गाव एकवटले होते. मिरवणुकीची लगबग सुरू होती आणि नागरिकांसह तरुण मोठ्या संख्येने जमले होते. मात्र याच उत्साहाच्या वातावरणात भरधाव कंटेनर मिरवणुकीतील गर्दीत घुसल्याने पिंप्रीराजा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. या भीषण अपघातात दोन स्थानिक शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एका पाच वर्षांच्या चिमुकल्यासह एकूण १२ जण जखमी झाले.
छत्रपती संभाजीनगरजवळील चितेपिंपळगाव-करमाड मार्गावरील पिंप्रीराजा गावात सोमवारी (१४ सप्टेंबर) रात्री ही दुर्घटना घडली. चिकलठाणा येथून आणण्यात आलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची गावाच्या वेशीपासून मिरवणूक काढण्याची तयारी सुरू होती. त्यासाठी गावातील नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने एकत्र आले होते.
याच वेळी चितेगावकडून येणारा बाराचाकी कंटेनर क्रमांक MH 21 BH 7416 गतिरोधकावर आदळला. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती आहे. अनियंत्रित झालेला कंटेनर पुढे मिरवणुकीतील ट्रॅक्टर, पिकअप आणि दुचाकींना धडक देत नागरिकांच्या गर्दीतून पुढे गेला.
अचानक कंटेनर गर्दीत घुसल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. काही तरुणांनी प्रसंगावधान राखून बाजूला उड्या मारल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र काही क्षणांपूर्वी गणरायाच्या आगमनासाठी असलेले आनंदाचे वातावरण या भीषण दुर्घटनेनंतर आक्रोशात बदलले.
अपघातात विठ्ठल रामभाऊ जाधव आणि रमेश लहुजी बनसोडे यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही स्थानिक शेतकरी होते. दिवसभराचे काम आटोपल्यानंतर ते गणपतीची मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबले होते.
या दुर्घटनेत हर्षवर्धन पवार आणि गणेश पवार यांच्यासह एकूण १२ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पाच वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर घटनास्थळी संतापाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त ग्रामस्थांनी कंटेनर चालकाला पकडून मारहाण केल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीदरम्यान वाहनाचे ‘ब्रेक फेल’ झाल्याचा दावा चालकाने केला आहे. मात्र हा चालकाचा दावा असून अपघाताचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही. करमाड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा