छत्रपती संभाजीनगर : छावणीतील चांदमारी कॉर्नरवर रिक्षातून आलेल्या तीन व्यक्तींनी एका रिक्षाचालकाला शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. रिक्षाची चावी काढण्यास विरोध केल्यानंतर फिर्यादीच्या पत्नीचा हात पिरगळण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 384/2026, भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 352, 351(2)(3), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश किसनराव रावळकर (वय 54, व्यवसाय रिक्षाचालक, रा. कासलीवाल तारांगण, मिटमिटा, छत्रपती संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
12 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 8.30 वाजता फिर्यादी आपल्या पत्नीसह रिक्षातून चांदमारी येथून पडेगावकडे जात होते. चांदमारी कॉर्नरवर पोहोचल्यानंतर रिक्षा क्र. MH-20-EK-2356 मधून आलेल्या तीन व्यक्तींनी शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
त्यातील एक व्यक्ती फिर्यादीच्या रिक्षाची चावी काढत असताना त्यांच्या पत्नीने प्रतिकार केला. यावेळी तिचा हात पिरगळण्यात आला आणि संबंधित व्यक्तीच्या हातातील कोणत्यातरी वस्तूमुळे तिच्या उजव्या मनगटाला जखम झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आरोपी म्हणून संबंधित रिक्षाचा चालक आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींचा उल्लेख आहे. गुन्हा 13 सप्टेंबर रोजी दुपारी 2.32 वाजता दाखल करण्यात आला. पुढील तपास छावणी पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा