Top News

छत्रपती संभाजीनगरमधील ‘हे’ मुख्य रस्ते आणि गल्ल्या राहणार बंद; 🚨 गणेश विसर्जन मिरवणूक : वाचा पोलिसांची नवी नियमावली आणि पर्यायी मार्ग!



छत्रपती संभाजीनगर : 
दिनांक २५/०९/२०२६ रोजी अनंत चतुर्दशी असून, सालाबादप्रमाणे छत्रपती संभाजीनगर शहरात विविध भागांतून ‘श्री’ गणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघणार आहेत. या मुख्य मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होणार आहेत. मिरवणूक मार्गावर भाविक व शहरातील दैनंदिन कामकाजानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ निर्माण होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेस, जीवितास धोका, अडथळा किंवा गैरसोय होऊ नये, यासाठी वाहतूक नियमन करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ (१९५१ चा अधिनियम क्र. २२) चे कलम ३३(१)(ब) सह मोटार वाहन कायदा १९८८ (१९८८ चा अधिनियम क्र. ५९) चे कलम ११५ व इतर प्राप्त अधिकारान्वये पोलीस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर हद्दीत वाहतूक नियमनासाठी अधिसूचना जारी केली आहे.  

दिनांक २५/०९/२०२६ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून ‘श्री’ गणेश विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत खालील मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहतील.

विसर्जन मिरवणुकीमुळे शहरात बंद राहणारे मुख्य मार्ग आणि गल्ल्या :

१) मुख्य मिरवणुकीचा मार्ग : संस्थान गणपती ते गांधीपुतळा, सिटीचौक, गुलमंडी, बाराभाई ताजिया, बळवंत वाचनालय, एस.बी. कॉलेज मार्गे जिल्हा परिषद मैदान.

२) संस्थान गणपती ते शहागंज चमन, गांधीपुतळा, सिटीचौक, जुनाबाजार मार्गे भडकलगेट.

३) जिन्सी चौक ते संस्थान गणपती, जाफरगेट-मोंढा ते राजाबाजार.

४) निजामोद्दीन दर्गा रोड ते निजामोद्दीन चौक व डावीकडे शहागंज चमन.

५) भुरे पहेलवान यांचे घर ते निजामोद्दीन चौक व उजवीकडे शहागंज चमन.

६) चेलीपुरा चौक ते गांधी पुतळा, मंजुरपुरा चौक ते गांधीपुतळा.

७) लोटाकारंजा ते सराफा रोड, रोहिला गल्ली ते सराफा रोड.

८) कामाक्षी लॉज ते सिटीचौक व पुढे गुलमंडी, बाराभाई ताजिया, गोमटेश मार्केट मार्गे पैठणगेट या रस्त्यावरील सर्व पूर्व-पश्चिम गल्ल्या बंद राहतील.

९) सिटीचौक पोलीस स्टेशन परिसरामधील बु-हाणी हायस्कूलकडे जाणारी गल्ली.

१०) बुढीलाईन, जुने तहसील कार्यालय, जुना बाजार, बारुदगरनाला.

११) सिल्लेखाना चौक, पैठणगेट, बाराभाई ताजिया, रंगारगल्ली, सिटीचौक.

१२) सावरकर चौक, एम.पी. लॉ कॉलेज, महात्मा फुले पुतळा/बळवंत वाचनालय चौक.

१३) अंजली टॉकीज, महात्मा फुले चौक ते बाबुराव काळे चौक.

१४) रॉक्सी कॉर्नर, जिजामाता कॉलनी ते बाबुराव काळे चौक.  

शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग :

१) रोशनगेटकडून शहागंजकडे जाणाऱ्या सर्व वाहनांसाठी चेलीपुरा चौक, लोटा कारंजा, सिटी चौकच्या पाठीमागील रोडने वाहतूक चालू राहील.

२) मिलकॉर्नरकडून औरंगपुऱ्याकडे येणारी सर्व वाहने अंजली टॉकीज जवळून उजवीकडे नागेश्वरवाडी, डॉ. खनाळे हॉस्पिटल, निराला बाजार, समर्थनगर मार्गे तसेच अंजली टॉकीजपासून डावीकडे खडकेश्वर, म.न.पा. मार्गे जातील.

३) क्रांतीचौकाकडून येणारी सर्व वाहने सिल्लेखाना चौक, समर्थनगर चौक मार्गे बसस्थानकाकडे जातील.  

नवीन छत्रपती संभाजीनगर सिडको/हडको, गजानन महाराज मंदिर विसर्जन मिरवणूक मार्ग :

खालील दर्शविलेल्या मार्गाने वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील.

१) चिश्तिया चौक-अविष्कार चौक-बजरंग चौक ते बळीराम पाटील शाळा चौक, ओंकार चौक ते सिडको पोलीस स्टेशन समोर-एन-७ बस स्टॉप-पार्श्वनाथ चौक-एम-१-एम-२-एन-११-त्रिमूर्ती चौक-टी.व्ही. सेंटर चौक ते एन-१२ स्वर्ग हॉटेल जवळील ब्रिजपर्यंत, तसेच त्रिमूर्ती चौक ते शरद टी.

२) चांदणे चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, टी.व्ही. सेंटरकडे जाणारा रस्ता.

३) एन-१ चौक ते चिश्तिया चौक, सेंट्रल जकात नाका तसेच चिश्तिया चौक ते द्वारकादास शामकुमार साडी सेंटर.

४) आझाद चौक ते बजरंग चौक, देवगिरी नागरी सहकारी बँक.

५) सेव्हनहील ते शिवाजीनगर, त्रिमूर्ती चौक ते गजानन महाराज मंदिर, पटियाला बँक ते गजानन महाराज मंदिर.  

नवीन छत्रपती संभाजीनगर परिसरासाठी पर्यायी मार्ग :

१) सेंट्रल नाका व चिश्तिया चौकाकडून एन-१ चौक व टी.व्ही. सेंटरकडे जाणारी वाहने ही मणियार चौक, द्वारकादास शामकुमार साडी सेंटर, जीएसटी कार्यालय, व्हीआयपी मराठा हॉटेल, एसबीआय बँक मार्गे किंवा सेव्हनहील, हायकोर्ट सिग्नल, जळगाव टी पॉईंट, एन-१ चौक, वोखार्ड टी, आंबेडकर चौक, शरद टी, हर्सूल टी, जटवाडा टी, हडको कॉर्नर मार्गे जातील व येतील.

२) जिल्हाधिकारी कार्यालय ते गणेश कॉलनी मार्गे टी.व्ही. सेंटरकडे जाणारी वाहतूक उद्धवराव पाटील चौक, हडको कॉर्नर मार्गे जातील व येतील.

३) पटियाला बँक ते गजानन महाराज मंदिर चौकाकडे येणारी वाहने हिंदू राष्ट्र चौक, विजयनगर, गजानन कॉलनी, रिलायन्स मॉल मार्गे जातील व येतील.

४) जवाहरनगर पो. स्टे. ते गजानन महाराज मंदिराकडे येणारी वाहने माणिक हॉस्पिटल, डॉ. हेडगेवार हॉस्पिटल पाठीमागील रोडने त्रिमूर्ती चौकाकडे जातील व येतील.

५) त्रिमूर्ती चौक ते गजानन महाराज मंदिराकडे येणारी वाहने डॉ. हेडगेवार हॉस्पिटलचे पाठीमागील रोड, माणिक हॉस्पिटल, जवाहरनगर पो. स्टे. मार्गे जातील व येतील.

६) सेव्हन हील उड्डाणपूलकडून गजानन महाराज मंदिराकडे येणारी वाहने जालना रोडने आकाशवाणी मार्गे जातील.  

अत्यावश्यक वाहनांना निर्बंधातून सूट

सदरची अधिसूचना ही अत्यावश्यक सेवा उदा. पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहन, गणपती विसर्जन मिरवणुकीत सामील होणारी देखाव्याची व तत्सम अत्यावश्यक वाहनांना लागू असणार नाही.

अधिसूचनेचा भंग करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३१ व अन्य फौजदारी कायद्यांन्वये शिक्षेस पात्र राहील, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने