सुधीर जगदाळे | छत्रपती संभाजीनगर
दुष्काळग्रस्त भागांसाठी १२ मोठ्या सवलती आणि उपाययोजना
शासन निर्णयानुसार, 'Trigger-1' लागू झालेल्या २६५ तालुक्यांमधील दुष्काळग्रस्त भागासाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून तातडीने खालील सवलती लागू केल्या आहेत:
१) जमीन महसुलात सूट.२) बाधित शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन.
३) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस तातडीने स्थगिती.
४) कृषी पंपाच्या चालू वीजबिलात सूट (७.५ हॉर्सपावरपर्यंत क्षमतेच्या वीजपंपांचे वीजबिल आधीच माफ असून, त्यावरील क्षमतेच्या पंपांना ही सूट लागू असेल).
५) बाधित भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात पूर्ण माफी.
६) रोहयो (रोजगार हमी योजना) अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करणे.
७) पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी आवश्यक तिथे टँकर्सचा वापर करणे.
८) टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करणे.
९) शेतीवर आश्रित शेतकरी आणि मजुरांना अन्नधान्याची टंचाई भासणार नाही, याची चोख व्यवस्था करणे.
१०) जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध होईल याची तात्काळ व्यवस्था करणे.
११) जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करणे.
१२) पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्यासाठी काटेकोर नियोजन करणे.
पीक नुकसानीची प्रत्यक्ष आर्थिक मदत स्वतंत्र शासन निर्णयाने
या शासन निर्णयाचा सर्वांत महत्त्वाचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. २६५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी नेमकी किती आर्थिक मदत मिळणार, याची रक्कम या शासन निर्णयात निश्चित केलेली नाही. विहित कार्यपद्धती पूर्ण केल्यानंतर शेतपिकांच्या नुकसानीची मदत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर केली जाईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्याचा निर्णय हा दुष्काळी परिस्थिती घोषित करून पंचनामे आणि विविध सवलती सुरू करण्याचा महत्त्वाचा पहिला टप्पा आहे.
जिल्हानिहाय दुष्काळग्रस्त तालुक्यांची संपूर्ण यादी
शासन निर्णयाच्या परिशिष्ट-१मध्ये ‘ट्रिगर-१’ लागू झालेल्या तालुक्यांची जिल्हानिहाय यादी देण्यात आली आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एकही तालुका या यादीत नाही; तर उर्वरित नमूद जिल्ह्यांमधील एकूण २६५ तालुके समाविष्ट आहेत.
रायगड — १ : श्रीवर्धन.
रत्नागिरी — ३ : रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर.
सिंधुदुर्ग — ८ : सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला.
नाशिक — १० : मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा.
धुळे — ४ : धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर.
जळगाव — १५ : एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल.
नंदुरबार — ६ : अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा, अक्राणी.
अहिल्यानगर — १४ : नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता.
पुणे — ८ : भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर.
सोलापूर — ११ : उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा.
सांगली — ४ : मिरज, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ.
सातारा — ६ : सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर.
कोल्हापूर — ६ : पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड.
छत्रपती संभाजीनगर — ९ : छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री.
जालना — ८ : बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफराबाद.
बीड — ११ : बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी.
लातूर — १० : लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट.
धाराशिव — ८ : धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परंडा, उमरगा.
नांदेड — १४ : नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव.
परभणी — ९ : पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी.
हिंगोली — ५ : हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत.
बुलढाणा — १३ : जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, बुलढाणा, सिंदखेड राजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा.
अमरावती — १४ : अमरावती, भातकुली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरूड, मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर.
अकोला — ७ : अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी.
वाशिम — ६ : वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा.
यवतमाळ — १६ : यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी-जामणी, केळापूर, घाटंजी, राळेगाव.
वर्धा — ७ : वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी.
नागपूर — १४ : नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर.
भंडारा — ३ : भंडारा, पवनी, लाखांदूर.
गोंदिया — १ : तिरोडा.
चंद्रपूर — १२ : चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही, पोंभुर्णा.
गडचिरोली — २ : गडचिरोली, चामोर्शी.
पंचनाम्यांनंतर आर्थिक मदतीच्या पुढच्या निर्णयाकडे लक्ष
या शासन निर्णयामुळे २६५ तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीची प्रशासकीय प्रक्रिया निर्णायक टप्प्यावर आली आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे सुरू करून छायाचित्रे आणि जीपीएस को-ऑर्डिनेट्ससह पीक परिस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठवायचा आहे. त्यानंतर विहित प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रत्यक्ष आर्थिक मदतीसाठी स्वतंत्र शासन निर्णय जारी होणार आहे. त्यामुळे सध्या जाहीर झालेल्या १२ सवलतींसोबतच शेतकऱ्यांचे लक्ष पुढील आर्थिक मदतीच्या आदेशाकडे लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा