DLM ADVT

0


बुलढाणा नगरपरिषद निवडणुकीमध्ये बनावट मतदान करण्यासाठी आलेल्या तोतया मतदाराला पळून जाण्यास मदत करणे व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड, पुतण्या श्रीकांत गायकवाड व अनोळखी एक अशा एकूण तीन जणांवर बुलढाणा शहर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बुलढाणा शहरातील शासकीय तांत्रिक विद्यालयातील मतदान केंद्रावर एक व्यक्ती बनावट मतदान करण्यासाठी आला असता काही प्रतिनिधींच्या ते लक्षात आल्याने चांगलाच गोंधळ उडाला, हा व्यक्ती पळ काढत असतानाच काही नागरिकांनी त्याला पकडले आणि चांगलाच चोप दिला. दरम्यान कुणाल गायकवाड व श्रीकांत गायकवाड यांनी पोलीस कर्मचाऱ्याला लोटपाट करत पोलिसांच्या तावडीत असलेल्या व्यक्तीला पळून जाण्यास मदत केली, त्यावरून पळून जाणारा अनोळखी व्यक्ती, कुणाल गायकवाड आणि श्रीकांत गायकवाड यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

 तर दुसऱ्या घटनेमध्ये बुलढाणा शहरातीलच गांधी प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर तीन तोतया मतदारांनी बनावट मतदान केल्याप्रकरणी केंद्रप्रमुखांनी दिलेल्या तक्रारीवरून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन तरुण व एका महिलेचा समावेश आहे. त्यापैकी एक महिला व तरुणाला बुलढाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top