DLM ADVT

0


DHULE | टेकवाडा–खामखेडा रस्त्यावर कार जळून खाक; मानवी कवटी आढळल्याने खळबळ, चंद्रकांत धनगर यांच्या घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला

 टेकवाडा–खामखेडा रस्त्यावर आज पहाटे घडलेल्या भीषण घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रकांत प्रताप धनगर (वय ४३, रा. खामखेडा, ह.मु. सुरत) यांच्या मालकीची मारुती सुझुकी कार (क्रमांक GJ-06-JO-6325) रस्त्यावर पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना बुधवारी पहाटे सुमारे ४ वाजेच्या सुमारास घडली. जळालेल्या गाडीत मानवी हाडे व कवटी आढळून आल्याने सदर गाडीत चंद्रकांत धनगरच असावेत, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

चंद्रकांत धनगर हे काही वर्षापासून सुरत येथे वास्तव्यास होते. ते आपल्या मुळगावी खामखेडा येथे वडील व भावाला भेटण्यासाठी येणार होते. घटनेच्या आदल्या दिवशी सायंकाळी त्यांनी आपल्या भावाला तीन ते चार वेळा फोन करून “मी घरी येतोय” असे सांगितल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. 

ही घटना टेकवाडा–खामखेडा रस्त्यावर बन्सीलाल दगडू पाटील यांच्या शेताजवळ घडली. पहाटे गहूच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना अचानक मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता रस्त्यावर उभी असलेली कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली दिसली. काही वेळातच आगीने उग्ररूप धारण केल्याने जवळ जाणे शक्य झाले नाही. ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.

घटनेचे वृत्त समजताच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती  घटनास्थळी येऊन पाहणी केली असता मानवी हाडे व कवटी आढळून आली. त्यामुळे हा अपघात की अन्य काही, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबची टीम दाखल झाली असून नमुने गोळा करून तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच जळालेल्या वाहनाची तपासणी करण्यासाठी परिवहन विभागाचे अधिकारीही घटनास्थळी आले होते. वाहनात आग कशी लागली, स्फोट कशामुळे झाला, याचा तपास विविध अंगाने केला जात आहे.

दरम्यान, मृत्यू हा अपघाती नसून घातपाताचा असण्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. चंद्रकांत धनगर यांचा मृत्यू संशयास्पद असल्याने सखोल चौकशीची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी किशोर प्रताप धनगर (मोठा भाऊ) यांच्या तक्रारीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शिरपूर शहर पोलीस करीत असून फॉरेन्सिक अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Next
This is the most recent post.
Previous
थोडे जुने पोस्ट

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top