Chhatrapati Sambhajinagar : पैशांच्या हव्यासापोटी घरात घुसून रक्ताची होळी; टिळकनगर भागात व्यावसायिकावर चाकूने प्राणघातक हल्ला छत्रपती संभाजीनगर: शहरातील उच्चभ्रू टिळकनगर भागात सकाळी रक्ताचा थरार पाहायला मिळाला. जुन्या व्यवहाराचे पैसे पूर्ण फेडलेले असतानाही, केवळ अधिकच्या व्याजाच्या हव्यासापोटी एका व्यापाऱ्याच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने सपासप वार करण्यात आले. या जीवघेण्या हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी झाला असून त्याच्या हातावर 15 टाके पडले आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
अभिजितसिंह प्रकाशसिंह हजारी असं फिर्यादीचे नाव आहे तरशेख शायद शेखलाल (रा. कटकटगेट) असा आरोपीचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, विवेकानंद हाऊसिंग सोसायटीत राहणारे अभिजितसिंह प्रकाशसिंह हजारी (43) यांनी आपल्या व्यवसायासाठी 2023 मध्ये आरोपी शेख शायद शेखलाल (रा. कटकटगेट) याच्याकडून 10 लाख 40 हजार रुपये व्याजाने घेतले होते. हजारी यांनी या रकमेची पूर्ण परतफेड केली असतानाही, आरोपी शेख शायद याने १५ लाख रुपयांची बेकायदेशीर मागणी लावून धरली होती. एकटं गाठून घरातच केलं रक्ताळलेलं तांडव....
सकाळी ७ वाजेच्या सुमारास, हजारी यांच्या पत्नी आणि मुले बाहेरगावी गेल्याची संधी साधून आरोपी शेख शायद याने त्यांच्या घरात बेकायदेशीर प्रवेश केला. "माझे १५ लाख रुपये दे" म्हणत त्याने शिवीगाळ करत हजारी यांच्यावर हल्ला चढवला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने सोबत आणलेल्या चाकूने हजारी यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली. स्वतःचा जीव वाचवण्याच्या धडपडीत हजारी यांच्या दोन्ही हातांच्या तळहातावर आणि मनगटावर चाकूचे खोल वार लागले असून रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बहिणीच्या सतर्कतेमुळे वाचला जीव....
हल्ला सुरू असताना हजारी यांची बहीण माधवी परदेशी तिथे पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. त्यांनी मध्यस्थी केल्याने आरोपीने तिथून पळ काढला. या हल्ल्यात हजारी इतके गंभीर जखमी झाले की त्यांच्या हातावर 15 टाके घालावे लागले. "माझ्या कुटुंबाला याच्यापासून मोठा धोका आहे," अशी भीती हजारी यांनी आपल्या जबाबात व्यक्त केली आहे. पोलिसांची कारवाई आणि पुढचा तपास... जवाहर नगर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी शेख शायद शेखलाल विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार अनिल शेंडफड भाले या प्रकरणाचा तपास करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा